Sunday 22 June 2014

नवीन 'बाप'

परंपरागत कुटुंबांचा ढाचा गेल्या दोन तीन दशकात बदललेला दिसून येतो. घटस्फोट, दुसरे लग्न, नवीन संसार आणि या संसारात वाढणारी, रमणारी मुले ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. 'सावत्र' आई ही चेटकीण किंवा अगदी दुर्गुणाची पुतळी नसते आणि आईच्या नवीन जोडीदाराला, 'काका' किंवा तत्सम उपाध्या न देता बाबा किंवा त्याच्या नावाने हाक मारणे आता रुजायला लागले आहे. समाजही अशा कुटुंबाकडे मोकळ्या नजरेने बघायला लागला आहे. खरे तर नवीन नाते किंवा कुटुंब हे सर्वांसाठी एकाच वेळा सुखकर अनुभव असतोच असे नाही. जुन्या तुटलेल्या नात्यांचे कडू अनुभव, मुलांच्या कस्टडी किंवा आठवड्याच्या भेटायच्या वेळा आणि इतर जबाबदाऱ्या यातून अनेक रूपाने आधीचे नाते नवीन कुटुंबात डोकावत असतेच. आपल्या साथीदाराला सांभाळून घेताना मुलांनाही त्या नात्यात सामावण्याची धडपड या नव्या कुटुंबात दिसते. नाती तुटण्याची अनेक कारणे असली तरी नव्या संबंधांकडे मात्र आता नवीन सुरुवात आणि ती जुन्या पेक्षा सरसच असणार अशा आशावादी दृष्टीकोनातून पाहिले जाते, तसे आवश्यकही आहे. पण खरे तर हे नवीन नाते अधिक क्लिष्ट, चढत्या रस्त्याचे आणि मानसिक दृष्ट्या कस लावणारे असते. कालांतराने थोडे स्थिरस्थावर झाले, अनेक स्वप्ने वास्तविकतेच्या पातळीवर स्वीकारली गेली तरी या नातेसंबधातील मुलांशी जूळणूक बरेच काळ चालणारी असते. खरे तर 'सामान्य' कुटुंबातही मुले जशी वाढत जातात तसे पालकही 'पालक' म्हणून वाढतच असतात. आणि जिथे असे जुळवून घेणे, एकत्र वाढणे होत नाही तिथे संघर्ष, कलह हे ही असतातच. परंतु दुसऱ्या लग्नातील नात्यांना मात्र 'वेगळेपणाचा', जैविक ( biological ) आई /बाप नसण्याचा एक वेगळा पैलू असतो, आणि तो कधी कधी फार धारदार पणे पुढे येतो किंवा आणला जातो.
बहुतांशी कुटुंबामध्ये मुले अजूनही आईच्या कस्टडीत दिली जातात. त्यामुळे नवीन संसारात बहुधा बाबा ही addition असते. एकूणच ज्या पद्धतीने संगोपन आपल्याकडे होते, पुरुषसत्ताक पद्धती असली तरी आईकडचा प्रभाव मुलांच्या संगोपनावर जास्त असतो. त्यात विभक्त कुटुंबात जेव्हाआई बाबा वेगळे होतात त्या प्रक्रियात मुले आईबरोबर त्या प्रक्रियेमध्ये ओढली जातात आणि बहुतांशी तिच्याकडेच राहतात. वडिलांना जरी न्यायालयांनी भेटण्याचे, मुलांच्या इतर जबाबदाऱ्यात समान हक्क दिले असले तरी, एकूणच विभक्त झाल्यावर आईचा, तिच्या कुटुंबाचा जास्त प्रभाव त्यांच्या वाढण्यावर असतो. बरेचसे बाबा त्यामुळे कितीही committed असले तरी त्यांच्या आपल्या मुलांवरच्या हक्कावर, प्रभावावर मर्यादा येतेच. याची दुसरी बाजू म्हणजे ज्या आया मुलांच्या कस्टडी घेतात त्यांच्यावर अधिक जबाबदारी येते आणि एक स्त्री म्हणून त्या सर्व संयोजनातून जाताना तिला इतर अनेक घटकांचा सामना करावा लागतो. या विषयावर बरेच लिहिले गेले आहे
नवीन संसारातही जर मुले असतील तर त्यांची त्यांच्या आईशी अशीच जवळीक आणि आईवर अधिक जबाबदारी असते, त्यात आपल्या नवीन जोडीदाराला सामावून घेणे, नवीन नात्याची घडी बसवताना, मुलांना दुर्लक्षित वाटणार नाही अशा विवंचनेत ती असते. बाबावर मात्र नवीन मुलांना आपलेसे करून, त्यांच्यावर आपल्या मुलासारखे प्रेम करणे, त्यांच्या जबाबदाऱ्या उचलणे आणि स्वतःचे पती, पालक म्हणून स्थान निर्माण करणे असे आव्हान असते. कसे जुळवून घेतात हे नवीन बाप या परिस्थितीशी? मुळात त्यांनी आईशी लग्न केले म्हणून मुलांचे बाप बनावे अशी अपेक्षा ठेवणे संयुक्तिक आहे का ? का या नविन नात्यांना आपण परंपरागत कुटुंबाच्या ढाच्यात बसवू इच्छितो? बऱ्याच ठिकाणी आई आणि तिचा पार्टनर/ नवरा हे एक स्वतन्त्र नाते म्हणून बघतात, परंतु एकाच छताखाली जर सर्व राहणार असतील तर त्यांच्यातील नाते संबंध कसे असावेत? पालक बनताना biological घटक किती महत्वपूर्ण ठरावेत अशा नात्यात- दुसऱ्याच्या आपले मुल म्हणून स्वीकारणे, वाढवणे हे खरेच शक्य आहे का ? आधीच्या संसारातील अवशेष या ना त्या निमित्ताने पुन्हा पुन्हा नवीन नात्यात डोकावत असताना एका नात्याचे replacement म्हणून नवीन नाते बघावे का दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी ठेवून आहे तसा त्याचा स्वीकार करावा? कालांतराने आधीच्या नात्यात सर्वच वाईट नव्हते आणि आपल्याही चुका स्वीकारण्यास जेव्हा आपण तयार असतो, तेव्हा मित्रत्वाच्या नात्याने जुन्या सह्चराचा स्वीकार का करू नये - असे अनेक प्रश्न पुढे येताना दिसतात.
 या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हे लिखाण. माझा स्वतःचा संसार आणि मुले या अनुभवातून जात आहोत. कभी खुशी कभी गम असा प्रवास असला तरी तो फक्त त्यांचा biological बाप या प्रवासात नाही , म्हणून नाही. मुले वाढताना आणि वाढवताना येणारे विविध अनुभव आणि त्यावातिरिक्त आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा परिपाक हा प्रवास आहे. तुमचे अनुभव किंवा निरीक्षण काय आहे या बाबतीत, ऐकायला आवडेल.
मायबोलीवर संयुक्ता गटात लिहिलेले हे लिखाण. १० जून २०१४ ला प्रसिद्ध झाले होते व अनेकजणींनी यावर प्रतिसाद दिला होता. 

पेटेंटेड मराठी

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.
माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी. या ब्लॉगवर पण ही पोस्ट आहे. 
आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.
बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.
मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.
खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?
वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )
लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !
लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल. स्मित
ही पोस्ट मायबोलीवर १३ जून २०१४ ला प्रसिध्द झाली आहे. यावर आज दिनांक २२जून पर्यंत  ३०० पर्यंत प्रतिसाद आले होते -- अनेक लोकांनी आपले पेटंट इथे प्रसिद्ध केले आहेत. http://www.maayboli.com/node/49423

Tuesday 10 June 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १९ वा.सौदी अरेबिया संक्षिप्त इतिहास

सौदी अरेबिया, गल्फ देश-  संक्षिप्त इतिहास 

सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश.  अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांना एकत्रित करून १९३२ मध्ये सध्याच्या राजेशाहीची सुरुवात केली. हे चार भाग म्हणजे हेजाझ, नजद, पूर्वेचा अल-हसा आणि दक्षिणेकडील असीर. अब्दुलअझीझ  ने १९०२ साली रियाध काबीज करून खरे तर राजेशाही ची स्थापना केली होती. हेजाझ च्या भागातील तुरळक शहरी भाग वगळला तर हा भटक्या टोळ्यांचा प्रदेश. सातव्या शतकात प्रेषिताच्या मृत्युनंतर त्याच्या अनुयायांनी अरेबियाच्या पुढे जाउन मुस्लिम साम्राज्य वसवले तेव्हापासून मक्का व मदिना या ठिकानांना राजकीय व धार्मिक महत्व प्राप्त झाले. त्याआधीही मक्का व काबा तसे पूजनीय होतेच -पण इथल्या स्थानिक लोकांसाठी. जसे जसे मुस्लिम साम्राज्य वाढले तसे अरेबिया मागे पडला आणि नव्या राज्यकर्त्यांनी दुसरीकडे आपल्या राजधान्या वसवल्या. वार्षिक हजयात्रे शिवाय या भागात तसे काहीच स्वारस्य उरले नाही. १० व्या शतकापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत मक्केच्या शेरीफाकडे इथला स्थानिक कारभार आणि कैरो, इस्तंबूल किंवा बगदाद खिलाफातीशी त्याची निष्ठा अशी घडी ब्रिटीश येईपर्यंत कायम राहिली. सोळाव्या शतकात  पोर्तुगीजांच्या लाल समुद्रावरच्या आक्रमणाला शह देण्यासाठी ऑटोमन या भागात शिरकाव करून त्यांनी लाल समुद्र, पर्शियाचे आखात ( हेजाज, असीर आणि अल हसा ) हा भाग आपल्या अधिपत्याखाली घेतला. पुढची चार शतके गरजेनुसार ऑटोमन साम्राज्याच्या सत्ता आणि  सामर्त्यानुसार त्यांची  या भागावर पकड कमी जास्त होत राहिली.  साधारण १७४४ च्या सुमारास नजद भागातल्या सौद या घराण्याने इथे आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले आणि त्याला मदत मिळाली ती अब्दुल अल वहाब या कर्मठ धर्मप्रचारकाची. सुन्नी हनाबली पंथाच्या अल वहाबने वहाबी विचारसरणीचा व या  पंथाचा जनक . सौद्ची राजेशाही आणि या विचारसरणीचा प्रसार प्रचार  अठराव्या शतकात अरेबिया पासून सुरु झाला . १७७४ साली रियाध येथे स्थापन झालेल्या या राजेशाहीने बघता बघता पूर्ण सौदी  अरेबियाचा आज दिसणारा भाग  काबीज केला. १८१८ साली ऑटोमन साम्राज्याने मुहम्मद अलीस  येथे पाठवून या वाढत्या साम्राज्याचा बीमोड केला. नजदच्या  भागात त्यानंतरच्या कालावधीत १८२४ साली पुन्हा या राजघराण्याने आपली छोटीशी राजेशाही स्थापन केली. यानंतर पुढचे दीड शतक अरेबियावरच्या सत्तेसाठी सौद व अल रशीद या दोन घराण्यांमध्ये अनेक संघर्ष होत राहिले. १८९१ मध्ये अल रशीद ने सौद ला पराभूत केले त्यानंतर सौद कुटुंबास शेजारच्या कुवेतमध्ये आसरा घ्यावा लागला. १९०२ साली इब्न सौद ने रियाध पुन्हा ताब्यात घेतले व सौद कुटुंब परत नजदला आले. याच दरम्यान वहाबी शिकवणीने प्रेरित फैसल अल दाविश ने इथल्या टोळ्यांची मिळून इखवान ही संघटना बांधली होती. या संघटनेच्या मदतीने सौद ने १९१३ साली हसा चा भाग काबीज केला. याच दरम्यान मक्केच्या शेरीफ हुसेन ने ब्रिटीशांच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याविरुध्ह उठाव केला होता. हा उठाव असफल झाला पण पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्यच कोसळले व ब्रिटिशांनी इथे सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडीत मात्र सौद ने मुळीच भाग घेतला नाही. तो रशीद घराण्याबरोबर त्याच्या लढाया लढत राहिला १९२१ मध्ये पूर्ण नजद आणि नंतर १९२४ - २५ च्या दरम्यान हेजाज चा प्रांत त्याने  जिंकून प्रथम २१ साली नजद चा सुलतान, २६ साली हेजाजचा राजा आणि नंतर ३२ साली सौदी अरेबियाचा राजा म्हणून  सौदने स्वतास घोषित केले -- हा सौदी अरेबियाचा अगदी धावता इतिहास 
 आपली सत्ता स्थिर केल्यावर बाह्य आक्रमणापासून संरक्षणासाठी सौदीने ब्रिटिशांचे संरक्षित क्षेत्र म्हणून  आपला दर्जा मान्य केला व तसा करार ब्रिटिशाबरोबर केला.  या सर्व काळात या प्रदेशांतील आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. पूर्व किनाऱ्यावर  होणारी मोत्यासाठीची मासेमारी, व्यापारातून येणारा तुटपुंजा पैसा  आणि तीर्थयात्रेसाठी लावण्यात आलेला कर या दोन उत्पन्नाच्या साधनाशिवाय दुसरे काहीही निर्वाहाचे साधन १३६ मध्ये तेल विहिरी सापडेपर्यंत  इथल्या लोकांकडे नव्हते. तेलाचा शोध लागल्यावर एक वेगळी अर्थव्यवस्था इथे उभी राहिली. पुढच्या लेखात या अर्थव्यवस्थेबाबत आणि त्याच्या इथल्या राजकारणाबाबत पाहणारच आहोत. तेलाचा शोध, तेलकंपन्यांचे इथे येणे आणि पुढचा राजकीय इतिहास यावर गिरीश कुबेरानी  दोन पुस्तके लिहिली आहेतच. तेलावर आधारित या अर्थव्यवस्थेत मोठमोठ्या तेल कंपन्या इथल्या जमिनीत तेल उत्खननाची व निर्मितीप्रक्रियेची परवानगी मिळावी म्हणून या राजवटीला प्रचंड पैसा देतात. खरेतर त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा अगदी नगण्य भाग या कंपन्या इथल्या राजेशाहीस देतात. परंतु इथली आधीची हलाखीची परिस्थिती पाहता हा पैसा इथल्या लोकांसाठी प्रचंड मोठा आणि तोही काहीही हातपाय न हलवता आलेला. तेलासाठी लागणारे तन्त्रज्ञान, उत्खनन व निर्मितीसाठी लागणारे भांडवल, व्यवस्थापन, निर्मित मालाची विक्री या कशातच इथल्या लोकांना श्रम नाहीत.  या येणाऱ्या पैशाचा विनियोग त्यांनी आपल्या राजेशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी केला. बाहेरच्या जगाशी या निमित्ताने या समाजाचा संबंध जरूर आला परंतु  बाहेर चाललेल्या कुठल्याच आर्थिक किंवा राजकीय प्रक्रियांमध्ये काही या देशांनी  प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही त्यामुळे सामाजिक दृष्ट्या परंपरागत व्यवस्था इथे चालू राहिल्या. आधुनिकीकरणाची प्रक्रिया व त्या अनुषंगाने होणारी घुसळण इथे घडतच नाही. मध्ययुगीन बेदुयीन टोळ्या ज्याप्रमाणे आपला जीवनक्रम जगात तसेच आजही इथले लोक आपले व्यवहार करतात फरक एवढाच कि आज आर्थिक सुबत्ता इथे आहे जी पूर्वी नव्हती. इतर राष्ट्रांबरोबर यांचे संबंध आहेत पण त्यांना मिळणाऱ्या  बलाढ्य राष्ट्रांच्या संरक्षणामुळे इतर राष्ट्रांशी  स्पर्धा टिकून राहण्यासाठी किंवा आपले स्थान उंचावण्यासाठी या राष्ट्रांना करावी लागत नाही. १९३६ पासून आजतागायत या देशांच्या अर्थव्यवस्थेचा व त्यावर आधारित राजकारणाचा एक आकृतिबंध (pattern ) बनलेला आहे. 

दुसऱ्या  महायुद्धानानंतर सर्वच जगात वसाहतवादाविरुध्ह असंतोष वाढला त्यामुळे  त्याचेच दुसरे स्वरूप असलेला हा  संरक्षित क्षेत्राचा दर्जाही निकालात निघाला. ब्रिटन ने या सर्व देशांना स्वातंत्र्य दिले खरे पण यांच्यात आर्थिक वाटाघाटी होऊन दोन्ही राष्ट्रांना फायदेशीर असे करार त्यानी केले. १८९९ पासून संरक्षित असलेला कुवेत १९६१ साली स्वतंत्र झाला. १८२० पासून ब्रिटीश अधिपत्याखाली असणारा बहारीन १९७१ साली स्वतंत्र झाला. ओमान तसा संरक्षित प्रदेश नव्हता पण त्याच अर्थाच्या अनेक करारानुसार ब्रिटीश त्याच्याशी संबंध ठेऊन होते आणि ते आजतागायत तसेच आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ब्रिटनच्या संरक्षणाच्या भूमिका स्वतःकडे घेतल्या आहेत. १८५३ पासून संयुक्त अरब अमिरातीने ब्रिटीश संरक्षित करार केला होता.  १९७१ मध्ये यु. ए. इ स्वतंत्र झाला. क़तार १९१६ पासून असाच ब्रिटीशांच्या अंकित होता तो १९७१ साली स्वतंत्र झाला. 

एकंदरीत ही सर्व राष्ट्रे गेल्या ४०-५० वर्षात स्वतन्त्र व स्वायत्त राष्ट्रे म्हणून आपला कारभार पाहू लागली आहेत. याआधी शेकडो वर्षे बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे हे देश आणि समाज इतर समाजापासून तुटलेले होते. गेल्या दीड शतकात बाहेरच्या जगाशी संबध येउन आणि आर्थिक सुबत्ता येऊनही इथे आधुनिक शासनव्यवस्था उभ्या राहिल्या नाहीत. वर्षानुवर्षे चालत असलेल्या  टोळी समाजातल्या सत्ता आणि समाजव्यवस्थाच इथे अजून चालू राहिलेल्या दिसतात. त्यामुळे स्वातंत्र्य तर मिळाले, सत्ता मिळाली आणि आर्थिक सुबत्ता ही आहे पण स्वतःची अशी ओळख या राज्यकर्त्यांना नाही. आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे सत्ता आहे पण  परंपरागत  अधिकार सोडला तर दुसरा काही बेस नाही , कुठल्याही आधुनिक शासन प्रशासन संस्था यांच्याकडे नाहीत अशी परिस्थिती या राजेशाहांची स्वातंत्र्योत्तर काळात होती. परंपरेवर आधारित स्वताची सत्ता टिकवायची असेल तर त्या परंपरा व त्यातील हितसंबंध जोपासणे या राज्यकर्त्यांना भाग आहे. सौदी अरेबिया हे त्या मानाने अगदीच नवीन राज्य आणि या राज्य निर्मितीच्या कामात वहाबी पंथाचा मोठा सहभाग त्यामुळे सौदी सत्तेचे अधिष्ठान वहाबी विचारसरणीवर आधारित इस्लामचे अनुकरण. कर्मठ, कट्टर, शुद्धीवादी  आणि xenophobic अशा इस्लामच्या एका विशिष्ट अनुवादावर आधरित धर्मसत्ता म्हणून सौदी आपली ओळख यानंतरच्या काळात प्रस्थापित करताना दिसतो. खरे तर हे कर्मठ धर्मावर आधारित असे रूप सौदीस संरक्षण देणाऱ्या ब्रिटन अमेरिकेच्या आधुनिक प्रतिमेपेक्षा खूपच विरोधाभासाचे वाटते. आणि हा विरोधाभास कमी करण्यासाठी एका बाजूला अद्ययावत तंत्रज्नानावर आधारित शहरे, सुविधा हे देश स्थापन करताना दिसतात पण त्याचबरोबर आपली धार्मिक सत्ता आणि तीच अस्मिता म्हणून मोठ मोठ्या मशिदी, इस्लामिक स्कॉलरशिप, धर्माचा प्रसार प्रचार यात ही राष्ट्रे आपली सर्व साधन सामुग्री पणाला लावताना दिसतात. 

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १८ वा.ऑटोमन व वासाहतिक काळातला अरब आणि सौदी इतिहास



ऑटोमन व वासाहतिक काळातला  अरब आणि सौदी इतिहास 

आजची अरब राष्ट्रे समजायची असतील तर या आधीचा ऑटोमन व वसाहतवादाचा इथला इतिहास समजून घेतला पाहिजे. ऑटोमन साम्राज्यात हेजाझ चा मार्ग आणि मक्का आणि मादिनाचे संरक्षण या दोन गोष्टी सोडल्या तर या खंडहरात त्यांना मुळीच स्वारस्य नव्हते. पश्चिमेकडचे  एडन आणि येमेन चा भाग आणि १९ व्या शतकात अल हझ्झा म्हणजे आजच्या कुवेतच्या दक्षिणेकडचा भाग असा ओतोमानांचा विस्तार होता. ब्रिटीशांनाही सामुद्रिक व्यापारासाठी इथल्या किनाऱ्यांवर आणि मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर  मालकी हवी होती. आखातातल्या आतल्या टोळी समाजात या दोन्ही साम्राज्यांना काहीही रस नव्हता. एक तर  दळणवळणाच्या सोयी अभावी हे भाग दुर्गम होते आणि तिथे वाळवंट आणि दारिद्र्य या शिवाय काहीही नव्हते.  भटक्या आपापसात भांडणाऱ्या या टोळ्या शेजारच्या सध्याच्या इरक़ व सिरीया इथल्या भूभागावर अनेकदा आक्रमणे करत. हा भाग तुलनेने शेतीप्रधान व समृध्द. ओतोमानांच्या ताब्यात असलेल्या या भागावरील आक्रमणे रोखणे आणि मक्का व मदिनेला होणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंचे संरक्षण आणि तिथली कर आकारणी या दोन गोष्टीसाठी ऑटोमन साम्राज्याची  इथे उपस्थिती. ऑटोमन  खलिफा हा मुस्लिम धर्मियांचा प्रमुख आणि त्या नात्याने तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्र आणि तीर्थयात्री यांच्या देखभालीची आणि संरक्षणाची जबाबदारी परंपरेने खलीफाची असे.  अर्थातच इस्तंबूल मधून खलिफा किंवा त्याचे अधिकारी त्या काळात ही जबाबदारी प्रत्यक्ष निभवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी सीरियाच्या गव्हर्नरला ही करआकारणी, टोळधाडीपासून  शेजारच्या प्रांतांचे संरक्षण व मक्का मादिनेचे संरक्षण अशी जबाबदारी दिलेली. ऑटोमन साम्राज्यात जरी आखातातला काही भाग आला तरी इतर ठिकाणी झालेले बदल, सामाजिक राजकीय अभिसरण यापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत हा भाग अलिप्तच राहिला. ऑटोमन साम्राज्याची राज्य करण्याची पद्धतच तशी होतॆ. स्थानिक नेत्यांनी   खालीफाचे आणि खिलाफतीचे अधिपत्य मान्य करायचे, आवश्यक तो कर गोळा करून द्यायचा आणि स्थानिक कारभार मात्र त्यांचाच चाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनांच्या मदतीने बांधलेल्या बगदाद बानमुळे  ( Bahn - जर्मनमध्ये रेल्वे) पहिला मोठा बदल या भागात झाला. 

Inline image 1

तुर्कस्तानात इस्तंबूल पासून निघणारी ही रेल्वे लाईन बगदाद बसरा आणि दुसऱ्या बाजूला मादिन्यापर्यंत पोहचत होती. आतापर्यन्तची दुष्कर तीर्थयात्रा या रेल्वेमुळे अतिशय कमी वेळात व सुखपूर्वक होऊ लागली. ऑटोमन साम्राज्याचा विस्तार एडन आणि अल हज्जा ( दक्षिण कुवेत) पर्यंत वाढला. साहजिकच या रेल्वेमार्गाच्या देखभालीची जबाबदारी ऑटोमनांची झाली. याच वेळेस  हा मकका  येथील स्थानिक नेता व शेरीफ हुसेन  आपले सामर्थ्य या भागात वाढवू इच्छित होता. मक्का व मदिना ( हेजाझ प्रांत )  येथे त्याला मान्यता होतीच आणि त्याने ऑटोमन खलीफाचे  अधिपत्य मान्य केले होतेच.   हुसेन फार महत्वकांक्षी होता. संपूर्ण अरब प्रांताचा राजा होण्याचे त्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले नाही पण त्याच्या मुलांनी पुढच्या काळात  काय काय केले ते नंतर येईलच.  एडन बंदरात  या काळापर्यंत ब्रिटीशांनी आपला जम बसवला होता. भारतीय उपखंडातून येणारी जहाजे पुढे सुवेझ कालव्यामधून ब्रिटीश बेटांकडे येत जात होती. आणि या सर्वांचे नियंत्रण एडन बंदरातून होत होते. इथला आपला जम बसावा म्हणून किनाऱ्यालगतच्या टोळी प्रमुखांबरोबर ब्रिटीशांची या किनाऱ्यावर हुकुमतीसाठी हातमिळवणी सुरु झाली होतीच. पहिल्या महायुद्धआधीचा  हा कालखंड. ऑटोमन साम्राज्याविरुध्ह असलेला थोडा असंतोष, इथल्या महत्वाकांक्षी नेत्यांच्या लालसेला खतपाणी घालून आता ब्रिटिशानी वाढवायला सुरुवात केली.   पीटर ओ'टूलचा लॉरेन्स ऑफ अरेबिया हा याच विद्रोहावर निघालेला लोकप्रिय सिनेमा. यात थोमस लॉरेन्स हा ब्रिटीश अधिकारी इथल्या स्थानिक अरबांना ऑटोमन साम्राज्याविरुद्धच्या उठावास मदत करतो. ब्रिटीश नजरेतूनच या सिनेमाची  निर्मीती झालेली असली तरी त्या वेळची परिस्थिती बऱ्यापैकी या सिनेमात चित्रित केली आहे.    
Inline image 1   

पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि विजेत्या राष्ट्रांत नवीन भूभागांची वाटणी सुरु झाली. पहिले महायुध्द संपायच्या आधीच इंग्लंड आणि फ्रांसने रशियाच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याची विभागणी आपापसात केली होती. बोल्शविक सत्तेवर येउन १९१८ साली त्यांनी हा कट  उघडकीस आणला तेव्हा ब्रिटन फ्रांसची नाचक्की झाली पण तो भाग अलहिदा. Sykes–Picot Agreement, किंवा Asia Minor Agreement या नावाने हा प्लान ओळखला जातो. यानुसार अरब प्रांत हा ब्रिटीश व फ्रेंचांच्या मध्ये व रशियाला लागून असलेला भाग रशियास असा विभागणीचा बेत होता आणि राहिलेला प्रदेश हा आंतरराष्ट्रीय प्रदेश म्हणून पुन्हा यांच्याच अख्त्यरॆत. खाली या विभाजनाचा नकाशा दिला आहे. 
Inline image 1

याप्रमाणे ब्रिटीश जॉर्डन नदीपासून जॉर्डन, दक्षिण इराक़ भूमध्य समुद्रालगताचा हैफा चा भाग जेणेकरून या समुद्र्मार्गावर त्यांचे आधिपत्य राहील. फ्रेन्चांकडे दक्षिण पूर्व तुर्कस्तान, उत्तर इराक़, सिरीया आणि लेबनॉनचा काही भाग तर रशियाकडे इस्तंबूल, तुर्कस्तानच्या दोन्ही सामुद्र्धुन्या आणि अर्मेनियाचा ऑटोमन साम्राज्यातला भाग अशी विभागणी होणार होती. शरीफ हुसेनला ही या बेतात सामील करून त्याला स्थानिक अधिकार हेजाज च्या प्रदेशाचे द्यायचे आणि या सर्व  भागांच्या सीमा निश्चित करायच्या असा हा बेत होता.  आणि इथेही अरबस्तानाच्या वाळवणटी भागात या कोणालाही स्वारस्य नव्हते. हा तेल मिळण्याआधीचा कालावधी.  पहिल्या महायुद्धानंतर या बेतानुसार वाटणी झाली नाही तरी ब्रिटीशांनी इथल्या किनाऱ्यावर जम बसवताना इथे भारतासारखी वसाहत निर्माण केली नाही कारण त्यांचे हितसंबंध फक्त समुद्रमार्गे दळणवळण एव्हढेच राहिले. इथल्या स्थानिक नेत्यांना शेखांना त्यांनी स्थानिक कारभारात स्वयंपूर्णता राखू दिली आणि त्यांच्याबरोबर फक्त संरक्षित प्रदेश protectorate असे करार केले. सध्याचा या भागाचा नकाशा पाहिला तर 
Inline image 2

सौदी अरेबिया हा सगळ्यात मोठा देश पण इतर छोटे देश १९व्या शतकापासूनच अस्तित्वात आहेत. तेव्हाच्या शेखशाह्या ( sheikhdom)  आणि  आताचे हे स्वतंत्र देश.  महायुद्धानंतरच्या  mandate system चा भाग. या Mandate System ने त्यांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली . या system बद्दल आपण इराक़ सिरीया बद्दलच्या लेखात सविस्तर विचार करूयात. थोडक्यात नवा गडी  पण पुराना राज्य चालू राहिले ऑटोमनांची जागा ब्रिटीशांनी घेतली. बाह्य आक्रमणापासून संरक्षण आणि त्याबदल्यात समुद्र किनाऱ्याचा वापर असा हा सौदा होता. अंतर्गत राज्य व समाजरचना टोळीप्रधानच राहिली. ओमान मध्ये ब्रिटीशांची उपस्थिती (पPresence ) मर्यादित होता पण इतर ठिकाणी त्यांनी या Protectorate व्यवस्थेला एक औपचारिक रूप दिले होते. त्यानुसार या प्रदेशांचे सर्व परदेशी व्यवहार ब्रिटीश पाहणार म्हणजेच त्यांचे अस्तित्व एका अर्थाने ब्रिटीशांच्या अंकीतच होते. 


काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १७ वा.सौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रे



सौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रे 

सौदी अरेबिया, एका बाजूने प्रचंड समृद्धी, विकास आणि अद्ययावत सोइ  सुविधांनी सज्ज अशी शहरे पण त्याचबरोबर परंपरागत अरब समाज असे परस्परविरोधी चित्र समोर येते. परिस्थिती आहेही तशीच - पाश्चात्य देशातील सुखवस्तूनची मोठी बाजारपेठ आणि त्याचबरोबर परंपरेने चालत आलेला प्रगैताहासिक चाली रीतींवर आधारित समाजसंघटन. अद्ययावत संसाधने आणि बक्कळ समृद्धी पण त्याचबरोबर सामाजिक बदलात अगदीच मागे असा नव्या जुन्याचा संगम असलेला हा प्रदेश. ओमान आणि येमेन हे तुलनेने कमी संपन्न  देश वगळता सर्वच देशांत हा विरोधाभास दिसून येतो. पाश्चात्य देशांतील उपभोग्य वस्तूंबरोबरच अद्ययावत शस्त्रास्त्रे, सर्व प्रकारचे विलास आणि ऐश आरामाची साधने, कार्यक्रम उदा फॉर्म्युला वन, उंटाच्या शर्यती, महागडे व्यापार प्रदर्शने इत्यादी इथे भरताना दिसतात. परंतु अंतर्गत समाजरचना आणि प्रथा, रिवाज हे अजूनही शेकडो वर्षे जुन्या अशा विचित्र द्वंद्वात हा समाज जगताना दिसतो. या विसंगत वागण्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे उत्तुंग इमारती आणि झगमगाटीत उभ्या असलेल्या शहरातील महिला मात्र बुरख्याच्या आत आणि त्यांना सर्वाजनिक जीवनाची सर्व दारे बंद! नोकरीधंद्यात नगण्य असे त्यांचे प्रमाण, एकटीने संचार स्वातंत्र्य नाही, ड्रायव्हिंगची, खेळात भाग घेण्याची परवानगी नाही, एकूणच स्वतंत्र असे अस्तित्व या महिलांना नाही. आधुनिक, पाश्चिमात्य देशांचे अनेक बाबतीत अनुकरण करणारे हे देश जुन्या टोळीच्या  समाज संरचनेस अगदी घट्ट धरून बसताना दिसतात. इथे धर्म आणि टोळींचा रिवाज असा फरक करण्याची गरज आहे. स्त्रियांचे एकूण समाजातील स्थान, त्यांनी कसे वागावे, राहावे याबाबतीतले नियम हे मुख्यतः अरबस्तानातल्या टोळी समाजाचे नियम परंतु ते धार्मिक नियम म्हणून इथून प्रसारित होताना दिसतात आणि इतर समाजावर लादलेले दिसतात. उदा मुस्लिम स्त्रिया वापरत असलेला  काळा बुरखा हा खरे तर इथल्या खालिजी  टोळीतील स्त्रियांचा परिवेश परंतु आज जगात - शिया धर्मीय सोडता हाच मुस्लिम स्त्रियांचा वेश आणि त्याला एक धार्मिक अधिष्ठान अशी गल्लत दिसते. महाराष्ट्रातील अगदी छोट्या खेड्यापाड्यात हे लोन पोहचलेले आहे. काही दशकांपूर्वी इथे आणि उत्तर भारताचा अपवाद सोडता  प्रचलित असलेली साडी आता कमी दिसू लागली आहे. हाच बदल पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये झालाच पण आज पाश्चिमात्य देशांमध्येही मुस्लिम स्त्रिया स्वतःची वेगळी अस्मिता दाखवण्यासाठी हा परिवेश अट्टाहासाने धारण करताना दिसतात.  त्यांच्या व्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून आज इतरांनी त्याला स्वीकृती दिलेली दिसते आणि असेलही तो व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक - कोणी काय घालावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि सोयीचा भाग - स्वातंत्र्यपूर्व काळात नववारी सोडून कुर्ता पायजमा घालता यावा यासाठी तेव्हा घराघरात वाद झालेच होते किंवा माझ्या पिढीला जीन्स घालता यावी म्हणून वाद झाले होते -- आजच्या तरुणांना यात वाद काय घालायचा इतपत जीन्स आता सर्वमान्य झालीच आहे. परंतु जेव्हा एखादी गोष्ट धर्माचा भाग म्हणून स्वीकारली जाते आणि लाद्लीही जाते तेव्हा ती नक्कीच आक्षेपार्ह असणारी गोष्ट. मुद्दा हा कि धर्म आणि संस्कृती आणि मुस्लिमांच्या संदर्भात  इस्लाम आणि अरबांची टोळी संस्कृती यात फरक केला जात नाही, परिणामी जे या अरब देशांत घडते त्याला धार्मिक मान्यता म्हणून सर्व मुस्लिम जगात ते स्वीकारले  जाते. 

 या सर्वमान्यातेचे कारण म्हणजे इस्लामी जगतात सौदीस  अनन्यसाधारण  असे महत्व आहे -   भोगोलिक आणि आध्यात्मिक इस्लामच्या केंद्रस्थानी हा देश  आहे. इस्लामची पवित्र तीर्थक्षेत्रे मक्का आणि मदिना इथेच आहेत. इथूनच प्रेषिताने धर्मप्रसार सुरु केला होता. मुस्लिम धर्मीयांना पवित्र असलेला काबा सौदीमध्ये आहे. प्रेषिताने इथून धर्मप्रसार सुरु केला आणि त्याचबरोबर काब्याच्या २० मैल परिसरात रक्तपात आणि हिंसेला बंदी केली. त्याकाळी आपापसात झगडणाऱ्या टोळ्यांमध्ये एकी निर्माण व्हावी हाच प्रेषिताचा हेतू होता. प्रेषित कालपासूनच काबा मुस्लिमांचे तीर्थक्षेत्र असून दर वर्षी तिथे करोडोच्या संख्येने मुस्लिम जमतात. इस्लामच्या पाच मुलभूत कर्तव्यापैकी एक म्हणजे हाज - काब्याची तीर्थयात्रा. या करोडो लोकांच्या तीर्थयात्रेची सोय आणि काब्याची व्यवस्था या दोन्ही गोष्टींची जबाबदारी सौदीच्या शासकांकडेच आहे. सौदी राजाचा उल्लेख काब्याचा रक्षक, पालक असा केला जातो. मक्का आणि काब्यालाजाणारे मार्ग तीर्थ यात्रेकरूंसाठी सुरक्षित राखण्याची जबाबदारी त्या त्या प्रदेशातील राजवटींची होती आणि या मार्गावर मिळणारा महसूल ही बर्यापैकी मोठा होता. जे जे इथे घडते ते ते सर्व मुस्लिम जगतात आदरणीय आणि अनुकरणीय समजले जाते.  परंतु सौदी आणि इतर मुस्लिम जगतातल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कमालीचे अंतर आहे. सौदी आणि इतर गल्फ देश त्यांच्या स्त्रियांना पूर्णपणे बुरख्यात ठेवून, सार्वजनिक आणि आर्थिक जबाबदार्यांपासून दूर ठेऊ शकतात कारण त्यांना ते परवडणारे आहे. इतर ठिकाणी उदा अफगाणिस्तान जिथे तलिबाननी हेच निकष स्त्रियांच्या दिसण्यास त्यांच्या समाजात वावरास लावले आणि त्याचा अतिशय वाईट परिणाम स्त्रिया, मुले आणि एकूणच समाजावर झाला. अफगाणिस्तानवरच्या लेखात याचे सखोल विश्लेषण येईलच. देशाच्या अर्ध्या आर्थिक दृष्ट्या सक्षम अशा घटकास अशा प्रकारे घरी बसवून ठेवणे हे पाकिस्तान, बांगलादेश व आफ्रिकेतील गरीब देशांना मुळातच न परवडणारी गोष्ट. पण इस्लामच्या या आखाती देशातून आयात केलेल्या प्रतिमांमध्ये आपल्याला बसवण्याचा आटोकाट प्रयत्न हे समाज करताना दिसतात. हा प्रश्न मागासलेल्या  समाजानी केलेले अनुकरण एव्हडाच नसून  मलेशिया आणि पाश्चात्य देशातील अनेक सुशिक्षित आणि स्वतंत्र स्त्रिया ही, स्त्रियांच्या वेशभूषेचे आणि वागण्याचे हे अरबी रूप स्वीकारताना दिसतात. याचे कारण तेलाच्या पैशावर चालणारे इस्लामीकरणाचे प्रकल्प  आणि त्यावर सौदीची आणि पर्यायाने वहाबी पंथाची घट्ट पकड होय. 

सौदी आणि एकूणच आखातातला हा समाज हा टोळीप्रधान तर आहेच पण त्याचबरोबर पितृसत्ताक आणि पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या कुळ आणि वंशावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता ही आहे. 
या समाज रचनेत टोळीप्रमुख आणि इतर यांच्यात एक प्रकारचे संरक्षक/ पालक - संरक्षित अशा श्रेणी आहेत. सर्व सत्ता एका किंवा टोळीमधल्या मुख्य पुरुषांच्या हाती असते. संरक्षणाच्या बदल्यात यांनी स्थापन केलेले रितीरिवाज सगळ्यांनी पाळावेत अशी ही व्यवस्था. हीच व्यवस्था शासनपातळीवरही दिसून येते. तेल विकून आलेल्या पैशावर वेगळ्या प्रकारचे कल्याणकारी राज्य इथे उभे आहे. यात जोपर्यंत तुम्ही शासकांच्या अंकित राहून त्यांच्या नियम रिवाजानुसार राहता तोपर्यंत तुम्हाला संरक्षण, या व्यवस्थेबद्दल बोलायचाही अधिकार या नागरिकांना नाही. समाजशास्त्रात यालाच अरब सामाजिक करार ( Arab Social Contract ) असे नाव आहे. या शासनव्यवस्थेत राजाला सर्व अधिकार - संपत्ती जमा  करण्याचे आणि उपभोगण्याचे ही. त्याबदल्यात लोकांच्या आर्थिक गरजा त्यांनी भाग्वाव्यात, लोकांनी या शासकाच्या नियमांचे पालन करावे, प्रश्न विचारू नयेत किंवा कुठल्याही प्रकारच्या राजकीय प्रक्रियेत सामील होऊ नये. पिढ्या नु पिढ्या चाललेल्या या उतरंडीच्या रचनेत सगळ्यांच्या जागा आणि भूमिका अगदी ठरलेल्या! अर्थातच ही व्यवस्था फक्त अरब राष्ट्रातच नाही तर मध्य युगीन युरोप आणि सद्य कालीन अनेक आफ्रिकन देशात दिसून येते. जिथे जिथे अशा सरंजामी व्यवस्थेचा आर्थिक पाया डळमळू लागतो तिथे तिथे या रचनांना आव्हाने मिळताना दिसतात. अरब राष्ट्रांत मात्र  हे होताना दिसत नाही . परंपरेने चालत आलेली घडी आता तेल  आणि ग्यासवर आधारित नव्या अर्थव्यवस्थेत  आणखीनच पुष्ट होताना दिसते. या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था या भाडेतत्वावर चालणार्या आहेत. मोठमोठ्या विदेशी कंपन्या या तेल आणि ग्यास  काढण्याचे, विकण्याचे काम करून प्रचंड नफा कमावतात. त्या नफ्यातला नगण्य भाग या देशात्तेल शासकांना दिला जातो. या देशातील जवळजवळ ४०% च्या वर उत्पन्न हे या भाड्याच्या मार्गाने मिळते आणि यात इथल्या जनतेला काहीही शर्म करावे लागत नाहीत. एका अर्थाने घरी बसून त्यांना हे आयते उत्पन्न मिळते आणि याच उत्पन्नाच्या जोरावर त्यांच्या परंपरागत समाजव्यवस्था चालू आहेत. या समाज व्यवस्थेचे आणि धर्माचे तसे काही देणे घेणे नाही. या सर्व देशांच्या आर्थिक बाबी या खरे तर त्यांच्या धर्मातील तरतुदींपेक्षा जास्त प्रमाणात समाजाचे विशिष्ट संघटन करताना दिसतात. या देशांतील लोक ज्या पद्धतीने राहतात, व्यवहार करतात आणि ते तसे करू शकतात कारण त्यांना मिळणारा हा पैसा, न की त्यांचा धर्म. पण याच सामाज्व्याव्स्थेस इतर मुस्लिम समाज मात्र धार्मिक अधिष्ठान देऊन प्रमाण मानतो, असे हे विचित्र त्रांगडे होऊन बसले आहे. 

पहिल्या लेखात आपण आधुनिकतेला प्रतिसाद देणारे चार नमुने पाहिले - अनुकरण, अंतर्गत सुधारणा, मुलतत्ववादी विचार आणि आधुनिकतेच्या तत्वांना नाकारून पारंपारिक व्यवस्थांचा पुरस्कार. सौदी आणि इतर आखातातले देश हे चौथ्या प्रकारात मोडतात. आम्हाला आमच्या समाज रचना, शासन व्यवस्था बदलायची मुळीच गरज नाही. ज्या व्यवस्था आहेत त्या अगदीच सुयोग्य आहेत असे यांचे म्हणणे. पण याच संदर्भात आपण केनिथ वाल्ट्झ यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या  सिद्धांताची चर्चा केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर देश , समाज एकमेकांशी संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यात सामाजीकरणाची, अभिसरणाची आणि त्यातून बदलाची प्रक्रिया होतेच होते असे केनिथ वाल्ट्झ म्हणतात.  आजच्या स्पर्धात्मक वातावरणात कुठल्याही देशाला टिकायचे असेल तर त्याला इतर देशांमध्ये जे बदल घडत आहेत ते स्वीकारावेच लागणार अन्यथा अशी राष्ट्रे व समाज हा नामशेष होईल असे वाल्त्झ्चे म्हणणे आहे. अरेबियन देशांकडे बघता त्यांनी काही बाबतीत हे अनुकरणाचे, स्पर्धेत राहण्यासाठी आवश्यक असे बदल केलेले दिसून येतात उदा अद्ययावत शस्त्रास्त्रे, तन्त्रज्ञान, उद्योग आणि शहरीकरण. परंतु विरोधाभास हा कि सामाजिक मुल्ये आणि समाजरचना मात्र मध्य युगीन ठेवण्यात, त्या न बदलता चालू राहिल्या आहेत. हे असे का झाले याचा विचार करता पहिली गोष्ट लक्षात येते ती अशी कि एकोणीसाव्या शतकापर्यंत हे देश तसे एकाकी आणि अत्यंत दुर्गम होते. अतिशय मागास आणि दरिद्री असा हा प्रदेश, यात कोणालाच स्वारस्य नव्हते. त्यामुळे इथला समाज जगातील बाकी घडामोडींपासून अलिप्तच राहिला. तुर्कस्तान किंवा इजिप्तमध्ये जे विचार, घडामोडी झाल्या त्या इथे होऊ शकल्या नाहीत कारण इथल्या दुर्गम वाळवन्टात ओटोमान किंवा युरोपीय वासाहात्वाद्यान काहीच मिळणार नव्हते. ओतोमानांची नाममात्र सत्ता इथे होति. अंतर्गत सारे व्यवहार त्यांनी इथल्या स्थानिक टोळ्यांवर सोपवले होते. विसाव्या शतकात समुद्र मार्गावर अधिपत्य गाजवण्याहेतू इथल्या किनारपट्टीत ब्रिटीशांना रुची निर्माण झाली व त्यांनी त्या बदल्यात या भूभागाला संरक्षण दिले. तेलाच्या विहिरींचा शोध लागेपर्यंत इथल्या वाळवन्टाशी कोणाचे घेणेदेणे नव्हते. विसाव्या शतकात ही परिस्थिती बदलली आणि सर्वच महासत्तांना तेलासाठी इथे येण्याचे प्रलोभान मिळाले. या महासत्तांनी रेड लाईन आखून या भूभागाची आपपसात वाटणी केली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. या देशांना उत्पन्न, संरक्षण , तंत्र्ज्नान आणि दळणवळणाची साधने अशी घर बसल्या विकसित झाली कारण तेलाच्या उत्खननासाठी आणि व्यापारासाठी उद्योजक आणि नोकरवर्गाची ती गरज होती. वाल्ट्झचा सिद्धांतानुसार छोटी राष्ट्रे आणि समाज या स्पर्धात्मक वातावरणात टिकणे अवघड असते.विशेषतः छोट्या परंतु नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न अशा देशांना शेजारची मोठी राष्ट्रे गिळंकृत करण्यास टपलेली असतातच. कुवेतच्या बाबतीत हेच झाले. इराकने तेल विहिरींसाठी कुवेतवर हल्ला केला पण त्याच वेळेस अमेरिका कुवेतच्या सहाय्यास धावून आली. कुवेतला स्वतःचा बचाव करण्यासाठी आधुनिक सैन्याची गरज नव्हती. ऑपरेशन डेजर्त स्टोर्म मध्ये विदेशी देशांच्या सहाय्याने आणि त्यांच्याच साधनसामुग्रीने  कुवेतवरचा हा हल्ला परतवला होता. या लढाईत सौदीचा सहभाग नाममात्र होता. सौदी कडे अद्ययावत सामग्री असली तरी ती वापरण्याचे कौशल्य, प्रशिक्षण नव्हते व आजही नाही. या देशांची ही परावलंबी मानसिकता समजून घेण्यासाठी या भागाचा इतिहास समजावून घ्यावा लागेल.

Monday 12 May 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १६वा. इजिप्त आणि मगरेब देश- राजकीय नेतृत्व

इजिप्त आणि  मगरेब देश- राजकीय नेतृत्व 

नासर नंतरचा इजिप्त 

इजिप्त आणि त्याचवेळेस स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये आढळणारा आणखी एक समान धागा म्हणजे या सर्व देशांमध्ये हुकुमशाही राजवटी ज्या स्वतःला पाश्चात्य  देशांच्या आधुनिक चौकटीत बसवायचा प्रयत्न करत असताना त्यांना  इस्लामिक विचारांकडून व संघटनांकडून झालेला विरोध. शीत युद्धाच्या काळात दोन्ही महासत्ता त्यांच्या अंकित किंवा मित्र असलेल्या राष्ट्रांना स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशातील हुकुमशाही राजवटी टिकवणे हा त्या जैसे थे परिस्थिती टिकवण्याचाच एक प्रयत्न. या महासत्ता आणि तिथल्या राजवटीना देशांतर्गत उभारलेल्या धर्मनिरपेक्ष आणि राजकीय दृष्ट्या पक्व अशा चळवळीनची जास्त भीती वाटत असे कारण या चळवळीत त्या त्या सत्तेस प्रश्न विचारायचे आणि प्रसंगी उलटावून लावण्याचे वैचारिक सामर्थ्य होते. या गटांना वाढू न देण्याचे व प्रसंगी दडपून टाकण्याचे धोरण या महासत्ता व त्यांच्या प्याद्यांचे होते मग ते डाव्या विचारसरणीचा सोविएत किंवा उजवा अमेरिका असो. याचाच परिणाम या देशांमध्ये राजकीय विचार, चळवळी, ज्या विचारांवर मतभेद आआहेत ते व्यक्त करण्यासाठी स्पेस या देशांत राज्यकर्त्यांनी बनू दिली नाही, वाढू दिली नाही. त्याचबरोबर या राज्यकर्त्यांची स्वतःची धोरणे राबवण्यासाठी आवश्यक असणारा संस्थात्मक ढाचाही त्यांनी निर्माण केला नाही. उदा  नासरने ज्या संयुक्त अरब आघाडीचा पुरस्कार केला, आतरराष्ट्रीय स्तरावर संघटनम्हणून या आघाडीस पुढे आणले त्याच आघाडीत एक सिरीया वगळता दुसरा देश सामील नव्हता. या आघाडीचा स्वतःचा संस्थात्मक ढाचा नव्हता, यात सामील होण्यासाठी काही नियम, पद्धती असा काहीच विचार किंवा आराखडा नव्हता. तीन वर्षात सिरीयाने जाहीर केले कि आम्ही आघाडी सोडत आहोत आणि ही आघाडी कोसळली. अशाच पद्धतीच्या युरोपिअन युनिअन निर्मितीच्या प्रक्रियेशी तुलना करता असे दिसते कि युनिअन हा ही सुरुवातीला एका विश्शिष्ट वर्गाचा प्रकल्प होता परंतु कालांतराने त्यावर चर्चा, नियम आणि संस्था विकसित करण्यात आल्या. युरोपिअन न्यायालय, पार्लमेंट, कमिशन अशा माध्यमातून या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणली गेली. परंतु अशा कुठल्याही प्रक्रिया स्वतंत्र अरब राष्ट्राच्या निर्मिती प्रक्रियेत होताना दिसत नाही आणि हाच संस्थात्मक, व्यवस्थात्मक संरचनेचा अभाव या हुकुमशाही देशांमध्ये दिसून येतो आणि जरी लोकशाही व्यवस्था असेल तरी राजकीय मतभेद व्यक्त करण्यसाठी ज्या अनेक लोकशाही संस्थांची निर्मिती आवश्यक असते त्यांच्या अभावी या लोकशाही व्यवस्था अपूर्णच दिसतात. अतिशय अपरिपक्व आणि  उथळ अशी राजकीय विचारसारणी आणि संस्कृती या देशांमध्ये दिसून येते. करिष्म्याच्या आधारावरच चाललेले राजकारण हे लोकशाहीस पूरक अशा संस्था व प्रक्रियांची निर्मितीस हानिकारक ठरते आणि एकदा का अशा व्यक्ती किंवा त्यांचे वलय संपले कि अनागोंदीची परिस्थिती निर्माण होताना दिसते. इजिप्तमध्ये नासरच्या अंतानंतर असेच झाले. परंतु त्याआधी सर्व प्रकारच्या राजकीय विरोधकांची गळचेपी झाली होतीच आणि जेव्हा वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष राजकीय विचार आणि प्रक्रिया मारल्या जातात तेव्हा अशा देशांमध्ये सगळ्यात शेवटचे संघटन हे धार्मिक स्वरूपाचे संघटन असते. मशिदींमध्ये, धर्माच्या आधारावर उभे राहत असलेल्या या संघटनावर त्या कालच्या शास्त्यांचा प्रभाव आणि हस्तक्षेप खूपच कमी असतो. नासर जरी अतिलोकप्रिय असला तरी त्याला राजकीय विरोधक हे होतेच आणि नासरने त्यांना त्याच्या राजवटीत दाबून ठेवले होते. वर वर दिसणाऱ्या डाव्या, धर्मनिरपेक्ष राजवटीतला असंतोष हा मशिदीमध्ये एकत्रित होत होता. नासारच्या मृत्युनंतर हा असंतोष बाहेर पडलाच व नासरच्या जागी आलेल्या अन्वर सादातने या असंतोषास आपली राजवट स्थिरावण्यासाठी वापरले. 

 अन्वर सादात 

अन्वर सादात हा नासरचा सहकारी. राजाविरुध्च्या बंडातील एक साथीदार पण नासारचा करिष्मा याच्याकडे नव्हता. नासरच्या  तुलनेत सादातकडे धडाडी, वक्तृत्व, लोकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य असे काहीच नव्हते परंतु तो एक विचारी शासक मात्र होता आणि नासरच्या कामात अभाव असलेली दूरदृष्टी आणि राजकीय डावपेच हे मात्र सादातच्या व्यक्तिमत्वात व नेतृत्वात होते. मुळात अन्वर सादातची निवड नासारच्या मृत्युनंतर आलेल्या प्रचंड पोकळी भरून काढण्यासाठी केलेली तात्कालिक तडजोड होती. नासारच्या तोडीचा, तेव्हडी उत्तुंग लोकप्रियता असलेला नेता इजिप्त मध्ये अर्थातच नव्हता. त्यातल्या त्यात सादातपासून कोणाला राजकीय धोका नव्हता. सादात सत्तेवर आला खरा पण आपली पकड बसवून अधिकार कसा स्थापन करायचा ही भ्रांत त्यालाही होती. त्याच्याकडे न तर करिष्मा, न कुठली परंपरागत ताकद आणि न ही  न्यायसंगत व्यवस्थेची घडी बसवण्यासाठी लागणारा वेळ आणि संसाधने !  मिळालेल्या सत्तेस आपण पात्र आहोत हे सिध्द करण्यासाठी काही तरी व्यावहारिक तोडगा काढणे सादातला आवश्यक होते. नासरच्या साहसी, जोखीम पत्करण्याच्या अगदी विरुध्द असा सादातचा  स्वभाव होता. त्य्यात त्याने दोन युद्धे ४८ आणि ६७ चे जवळून पाहिले होते, त्यात झालेली इजिप्तची नामुष्की आणि हानीचा देशाच्या विकासावर झालेला विपरीत परिणामही भोगला होता. विशेषतः १९६७ च्या युद्धात इजिप्तने सिनाई चा भूभाग हरला होता. सादातने युद्धात हरलेला भाग परत मिळवणे आणि सोवीयेतच्या छत्रछायेखालून निघून अमेरिकेच्या गटात जाण्यासाठी पावले उचलली. हे करताना अर्थातच त्याला नासरने बसवलेल्या वैचारिक आणि राजकीय समीकरणांना फाटा द्यावा लागणार होता. सादातने सोवियेतच्या मदतीने पुन्हा शस्त्रास्त्रे जमवून युद्धाची तयारी केली. १९६७ च्या युद्धाचा वचपा काढायचा असेल आणि जनमानसात इस्रायेल विरुद्धच्या युद्धात आलेल्या पराभवामुळे पसरलेल्या नैराश्यास दूर करायचे तर निदान इजिप्तचा गेलेला भूभाग परत मिळवणे भाग होते. युध्द जिंकणे हा सादातचा हेतू नव्हता. इजिप्तची लष्करी ताकद वाढवून इस्रायेल व त्याचा पाठीराखा अमेरिका यांना जरब बसावी आणि ६७ च्या युद्धात गेलेला भाग वाटाघाटीच्या माध्यमातून परत मिळावा हे सादातच्या १९७३ सालच्या युद्धाचे उद्दिष्ट होते आणि ते सफल झाले ही. इजिप्त एक समर्थ लष्करी सत्ता म्हणून यातून  आला. जरी सोविएतच्या सहाय्याने इजिप्तने हे रणशिंग फुंकले असले तरी सादातला अमेरिकेच्या कंपूत जायला या शक्तीप्रदर्शनाचा फायदा झाला. त्याचबरोबर क्यंप डेविड येथे इस्रायेल बरोबर वाटाघाटी  होऊन सिनाई भूभाग परत मिळवण्यात ही सादातला यश मिळाले. या वाटाघाटींचा परिणाम म्हणजे १९४८ पासून इस्रायेलच्या प्रश्नांवर सामाईक भूमिका घेणाऱ्या अरब लीगशी फारकत घेणे आणि त्याचबरोबर नासरने केलेला अरब जगताच्या नेतृत्वाच्या  दाव्यातून इजिप्तला मुक्त करणे होय. अरब लीग ने इजिप्त आणि सादातवर बहिष्कार टाकला कारण लीगच्या भूमिकेनुसार कुठलेही अरब राष्ट्र इस्रायेलशी स्वतंत्र वाटाघाटी करू शकत नव्हते. सादातनी त्या केल्या आणि त्याच्या या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेचे, इस्रायलला मान्यता देवून युध्द सोडून वाटाघाटीमार्गे सीमेचा प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रयत्न पाश्चात्य देशांत प्रशांसिला गेला. अमेरिकेच्या मध्यस्तीने झालेल्या १९७८ मधल्या केंप डेविड करारानुसार इजिप्तने इस्रायेलला राष्ट्र म्हणून मान्यता दिली, त्याच्याबरोबर राजनयिक संबंध स्थापण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात १९६७ च्या युद्धात गमावलेला भूभाग परत मिळवला. सादात आणि इस्रायेलच्या बेगीनला या बद्दल नोबेल पारितोषिक ही  मिळाले. 


मुस्लिम ब्रदर हूड 

सादात जेव्हा सत्तेवर आला तेव्हा त्याला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याचे विरोधक हे नासरवादी डाव्या विचारसरणीचे लोक नसून मुस्लिम ब्रदरहूडच्या प्रभावात राजकीय दृष्ट्या संघटीत झालेले इस्लामिक, धार्मिक गट आहेत. या गटास त्याला दुर्लक्षता येत नव्हते आणि त्यांच्या विरोधात जाण्याइतकी त्याची ताकद नव्हती, त्यामुळे या गटास आणि संघटनेस त्याने चुचकारायला सुरुवात केली. त्यांच्या धोरणांना पाठींबा द्यायला, त्यांच्या भूमिका जाहीर रित्या स्वीकारायला त्याने सुरुवात केली. नासरच्या सेकुलर धोरणांविरुद्ध सदातचे वागणे  व भूमिका होत्या. त्याने सईद कुतब या ब्रदरहूडच्या नेत्याशी जवळीक साधली आणि त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. यातली महत्वाची मागणी म्हणजे इजिप्तच्या घटनेचे दुसरे कलम बदलून शरीयावर आधारित कायद्यांचा स्वीकार. आधीच्या घटनेप्रमाणे शरीया हा इजिप्तच्या कायद्याचा एक स्त्रोत असे लिहिलेले होते आता ते खोडून शरीय हाच स्त्रोत असे केले गेले. इस्लामिक गटांची ही महत्वाची मागणी मान्य करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा सादातचा मानस होता. परराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या भूमिकेतून झालेले देशांतर्गत नुकसान भरून काढण्याचा सादातचा हा डाव होता. असाच डाव नंतर पाकिस्तानच्या झिया उल हक ने खेळला. मुस्लिम ब्रदर हूड ही १९२८ साली इजिप्त मध्ये स्थापन झालेली संघटना. १९४८ मध्ये इजिप्तच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांचा खून ब्रदरहूडशी संबंधित हसन नावाच्या विद्यार्थ्याने केला तेव्हापासून ब्रदर हूड वर इजिप्तमध्ये बंदी होती. ब्रदर हूड चा प्रमुख हसन बन्ना हा इस्मायीला या गावात शिक्षक होता. सुएझ कालव्याच्या मुख्यालय असलेले हे गाव, साहजिकच इथल्या समाजात बाहेरून आलेल्या ब्रिटीशांचा प्रभाव खूप होता. मागच्या लेखात आधुनिकतेचे प्रतिक असलेले असे वसाहतवादी प्रकल्प स्थानिक जनतेत कसे अंतर निर्माण करतात ते पाहिले. बन्नाने अशाच असंतुष्ट युवकांना एकत्रित करीन ब्रदर हूड ची स्थापना केली होती. १९४८ च्या इस्रायेल विरुद्धच्या लढ्यात या संघटनेचे कार्यकर्ते होतेच. परंतु यांचा पाषा आणि नंतर नासारच्या सेकुलर धोरणांना प्रचंड विरोध होता आणि नासर ने बर्याच प्रमुख कार्यकर्त्यांना अटकेत ठेवले होते. सादातने याच ब्रदरहुड्चे लांगुलचालन करायला सुरुवात केली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ब्रदर हूड चा लोकांमध्ये प्रभाव वाढला होताच आता त्यांना शासनात कायदेशीर स्थान मिळाले आता त्यांना लुटुपुटुच्या मार्गांनी समाधान नको होते तर त्यांना पूर्ण इस्लामिक अजेंडा राबवायचा होता. यातूनच देशात उग्र इस्लामिक वातावरण पसरायला सुरुवात झाली 
  
सादातला सुरुवातीला जम बसवताना आणि त्याच्या पर राष्ट्रीय धोरण नीतीमुळे आलेले मळभ दूर करायला याची मदत झालीच पण ६७ चे युध्द आणि डेवीड करारानुसार इजिप्तची जमीन परत मिळाली.  सादातचा हा विजयोत्सव सुरु असतानाच त्याच्या इस्लाम्बोली नावाच्या अर्मितल्याच अधिकाऱ्याकडून  खून झाला. राष्ट्राच्या सीमा न मानणाऱ्या आणि संपूर्ण मुस्लिम जगाचे एकीकरण करण्याचे ध्येय ठेवणाऱ्या ब्रदर हूड ला सादातची पाश्चिमात्य देशांशी चाललेली हात मिळवणी आणि इस्रायेलशी समझौता या गोष्टी मान्य होणे शक्यच नव्हते.  इस्लाम्बोलीवर रीतसर खटला झाला व त्याला देहांताची शिक्षा मिळाली पण येणाऱ्या काळातल्या इस्लामिक चळवळीत तो हुतात्मा  म्हणून ओळखला जातो. इराणच्या इस्लामिक शासनाने त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढले, शहरातल्या मोठ्या रस्त्यास त्याचे नाव दिले, अल क़ैदच्या एका मोठ्या तुकडीचे नाव इस्लाम्बोली आहे. सादातच्या हत्येच्या कटात आयमान झवेरी या सध्याच्या अल कायदाच्या नेत्यास ही अटक झाली होती आणि त्या वेळेस जरी ब्रदर हूड ची मुळे सादातनंतर आलेल्या मुबारक सरकारने उखडायचा प्रयत्न केला तरी देशातील माहौल हा बदललेला होता. नासारच्या स्वप्नातील सेकुलर इजिप्त जोमाने कात टाकून इस्लामिक स्वरूप धारण करत होता. 

सादातच्या मृत्यूमुळे इजिप्त समोर पुन्हा तोच नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला आणि सादातच्या वेळेस जे घडले तेच याही वेळेस घडले. होस्नी मुबारक या सुमार कुवतीच्या तडजोड प्याद्यास पुढे करण्यात आले. होस्नी मुबाराराक्ने ही सादातचे धार्मिक गटांचे लांगुलचालन चालूच ठेवले. मुबारक हा लष्करी अधिकारी, निम्न कर्तुत्व आणि करिष्मा किंवा पारंपारिक अधिकार असे काहीच त्याच्या पोतडीत नव्हते. त्याला आपला पदसिद्ध अधिकार जतवण्यासाठी लोकप्रिय अशा ब्रदरहूड आणि तत्सम संस्थाशी हातमिळवणीची गरज होतीच. मुबराकचे शासन पहिल्यापासूनच कमजोर होते त्यामुळे त्याने त्याच्या विरुध्द बोलणाऱ्या राजकीय विरोधकांची दडपशाही केली, जिथे शक्य होते तिथे काही गटांना चुचकारले व आपल्या सोबत घेतले आणि आपली सत्ता स्थिर करण्यासाठी लष्कराची मदत घेतली. अनेक नवमुक्त विकसनशील देश आणि इस्लामिक देश यात हे साधर्म्य नेहमीच आढळते -- जिथे जिथे सामाजिक राजकीय संस्थाचा, व्याव्साथांचा अभाव असतो तिथल्या शासकांकडे एकमात्र संघटीत अशे शक्ती असते आणि ती असते लष्कराची. या लास्कारांच्या जोरावरच अशा अनेक राजवटी टिकून राहिलेल्या दिसतात आणि हे शासक हि प्रचंड खर्च करून लष्कर ही संस्था जोपासताना दिसतात. मुबारकच्या काळात लष्करावर प्रचंड गुंतवणूक केली गेली आणि यात अमेरिकेने सक्रिय भाग घेतला. इजिप्तचे आर्थिक आणि लष्करी धोरण हे अमेरिका धार्जिणे होते. लष्करास बाह्य आक्रमणापासून संरक्षण या मुलभूत कामाबरोबरच आर्थिक आणि सामाजिक प्रक्रियेत महत्वाचे स्थान मुबारकच्या काळात दिले गेले. उद्योग धंदे, शेती, दळणवळण सर्व क्षेत्रात लष्कराचीच मुजोरी होती. गेल्या ४०-५० वर्षात इजिप्त आणि तत्सम देशांनी पाश्चात्य राष्ट्रांपुढे आम्ही ( शासनकर्ते ) किती विपरीत परिस्थितीत आधुनिक, पाश्चात्य मुल्ये टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि देशातील मागास, धार्मिक गटांपासून आम्हाला कसा धोका आहे याचे रस भरीत चित्रण करून त्यांची सहानभूती आणि मदत मिळवली होती. लोकशाही, सेकुलारीस्म आणि आधुनिक जीवनपद्धती टिकवायची असेल तर आमच्या शासनास पर्याय नाही असे चित्रण करून त्या बदल्यात या राज्यकर्त्यांनी आपली हुकुमशाही आणि भावबंद्कीच जोपासली होती. या राज्यकर्त्यांना होणारा अंतर्गत विरोध दडपला गेला होता आणि आधी म्हणल्याप्रमाणे फक्त धार्मिक संघटना एवढाच पर्याय जनतेसमोर होता. आज जो  असंतोष लोक व्यक्त करत आहेत आणि याच इजिप्तच्या तहरीर चौकातील लोन आज अनेक देशात पसरले आहे त्या सर्वांची मागणी इस्लामिक किंवा सेकुलर/ पाश्चात्य कि पौर्वात्य अशी नसून एक स्थिर, विकसनशील राजवट, किमान सोयी सुविधा -शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार पुरवणारी शासनयंत्रणा असावी, भाऊबंदकी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अतिप्रमाणात सत्ता आणि अधिकार न देता लोकांच्या राजकीय अधिकारांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे लोक मागत आहेत. मुबारकला पदच्युत करणे हा प्रतीकात्मक निर्णय आहे. या सर्व देशात राज्य शास्त्राच्या भाषेत ज्याला Praetorian problem म्हणतात तो आ वासून उभा आहे - लष्कराचे काम आणि संघटन बाह्य शत्रूपासुन संरक्षण पण हेच लष्कर आपल्याच लोकांविरुध्ह उभे राहते तेव्हा त्याला रोखणे आणि त्याचे नियंत्रण योग्य प्रकारे करणे हे जमले नाही तर पाकिस्तानात जे झाले तेच इतर ठिकाणी होनार. इजिप्त आणि अरब स्प्रिंगमध्ये सामील असलेल्या अनेक देशातून आणखी एक महत्वाचा प्रश्न पुढे आला आहे. खरे तर या प्रशांची झलक विविध मार्गाने गेल्या दशकात पुढे आली आहेच - पाश्चात्य राष्ट्रांची, विशेषतः अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची हे सारे प्रश्न समजून घेण्याची, त्यांना सोडवण्याच्या कामात काही योगदान करण्याची खरीच कुवत आहे का? सगळे प्रश्न हे दडपशाहीच्या मार्गाने सोद्वान्यातच हे देश पुढाकार घेणार आहेत का आणि असे जर असेल तर त्यांची जी कलंकित प्रतिमा या सर्व देशांच्या  मध्ये निर्माण झाली आहे त्यातून अधिक अधिक रक्तपात हेच होत राहील का? उत्तर आफ्रिकेत हा सगळा असणातोष धुमसतोय आणि त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सध्या तरी एका टोकाच्या भूमिकेशी येउन थांबले आहेत . हा लेख लिहिताना इजिप्तचे गेल्या दोन वर्षातले तिसरे सरकारहि कुचकामी ठरलेले दिसत आहे. अस्थिरतेतून अस्थिरतेकडे असाच हा प्रवास सध्या तरी दिसत आहे.  

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १५ वा. इजिप्त आणि मगरेब देश- सत्ता, अधिकार , नासर

इजिप्त आणि  मगरेब देश-  सत्ता, अधिकार , नासर 

राजकीय नेतृत्व - सत्ता, अधिकार 

नासरच्या यशात आणि अपयशात त्याच्या नेतृत्वगुणाचा मोठा वाटा होता. नासरचा करिष्मा लोकांवर मोहिनी घालणारा होता आणि त्या करिष्म्याच्या जोरावरच त्याला प्रचंड लोकमत, पाठींबा आणि संसाधने मिळाली. अशा वलयांकित नेतृत्वास टक्कर देण्यास परंपरावादी नेतृत्व सौदीतून उभे राहिले. इस्लामिक जगतात अशी करिस्मा आणि परंपरेवर आधारित नेतृत्वेच पुढे येताना दिसतात. हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याआधी राजकीय नेतृत्व कशासाठी आणि त्या अनुषंगाने राज्य करणे म्हणजे काय? राज्याची, शासनाची  आणि राज्यकर्त्याची भूमिका नक्की काय हे पाहणे आवश्यक आहे. खरे तर हा प्रश्न व्यक्ती आणि समष्टी च्या संबंधांचे विवेचन सुरु झाले तेव्हापासूनचा. पाश्चात्य विचारसरणीत रुसो, हॉब्स, लोके यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे राज्याची संकल्पना व सध्याची प्रारूपे समजावून घेता येतील. 

  पाश्चिमात्य संस्कृतीच्या वैचारिक इतिहासात ॲरिस्टॉटल (इ. स.पू. ३८४–३२२)  व प्लेटो (इ. स.पू. ४२८–सु.३४८यांच्या काळापासून सामाजिक कराराची उत्पत्तीस्वरुप आणि कार्य यांविषयीचे विश्लेषण आणि चर्चा सुरु होती. त्यांनी राज्यसंस्थेच्या उत्पत्तीचे मूळ मनुष्याच्या सहकारी भावनेत असल्याचे मत प्रतिपादन केले आहे. या कराराच्या संकल्पनेला अधिक सुसंगत आणि सुसूत्र स्वरुप सोळाव्या ते अठराव्या शतकांत टॉमस हॉब्जजॉन लॉक व झां झाक रुसो या विचारवंत तत्त्ववेत्त्यांनी दिले आणि आपल्या स्वतःच्या दृष्टीकोनातून या सिद्घांताचे परिशीलन करुन आपापले स्वतंत्र विवेचन मांडले. त्यामुळे या संकल्पनेला सैद्घांतिक व तात्त्विक बैठक प्राप्त झाली. या तत्त्ववेत्त्यांनी नागरी धुरीण समाजाला (लर्नेड सिव्हिल सोसायटी) मिळणाऱ्या सुविधाफायदे आणि प्राथमिक नैसर्गिक अवस्थेत ( अ स्टेट ऑफ नेचर ) असलेल्या लोकांचे तोटेअहितकारक गोष्टी यांची तुलना करुन राज्यसंस्था अस्तित्वात नसेलतर काय घडते याचे आनुमानिक (हायपॉथेटिकल) चित्र संघटित राज्यसंस्थेचे मूल्य आणि उद्दिष्टे विशद करुन सिद्घ करण्याचा प्रयत्न केला आहे.

 टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९याने रानटी दुःसह्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झालीअसे सामाजिक कराराचे विवेचन लेव्हायथन या ग्रंथात केले आहे. हॉब्जच्या वेळी इंग्लंडमध्ये यादवी युद्घजन्य परिस्थिती होती. ती टाळण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा सामाजिक कराराचा विचार त्याने मांडला. त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सार्वभौम सत्तास्थान असावे आणि समाजाने आज्ञापालन हे कर्तव्य मानावेअसे होते. त्याच्या मते अशी सार्वभौम सत्ता निरंकुश आणि अविभाज्य असते. अशा सार्वभौम सत्तेची इच्छा म्हणजेच देशाचा कायदा. त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करणे अवैध होय. हॉब्जच्या या सामाजिक कराराविषयीच्या तत्त्वज्ञानाने इंग्लंडमधील राजेशाही सत्तेला भक्कम स्थान मिळवून दिले.

जॉन लॉक (१६३२–१७०४याने हॉब्जनंतर हा विचार अधिक व्यापक व शास्त्रशुद्घ पद्घतीने टू ट्रीटिझिस ऑफ गर्व्हन्मेन्ट या ग्रंथातील दुसऱ्या प्रबंधात मांडला. या गंथात तो म्हणतो की‘मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था (अ स्टेट ऑफ नेचर) होती. त्या अवस्थेत सर्व मनुष्ये स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक व्यक्तीस आपले व्यवहार मनसोक्त करण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकमत गाजविणारी कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होतीती फक्त नैसर्गिक कायद्याची’. हॉब्ज नैसर्गिक कायदा व मानवी प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत,असे मानतो. हा कायदा म्हणजे आपण आपले व आपल्या बांधवांच्या जीविताचे रक्षण करावे आणि कोणीही इतरांचे स्वातंत्र्य आणि मत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नयेपरंतु या व्यवस्थेत एखाद्याने गैरवर्तन केल्यास त्याचा बंदोबस्त करणारी कोणी अधिकारी व्यक्ती ह्या व्यवस्थेत शक्य नव्हती. यातून मार्ग काढण्याकरिता माणसांनी आपले नैसर्गिक अवस्थेतील काही हक्क सोडण्याचे ठरविले आणि सर्वांनी मिळून एक सामाजिक करार करुन एक समष्टी निर्माण केली. या करारान्वये सर्व मनुष्यमात्रांची जीवनेस्वातंत्र्य आणि मत्ता यांचे रक्षण केले जावेअसे ठरले. मनुष्याची ही मूळ नैसर्गिक अव अवस्था आणि सामाजिक करार या दोन्ही गोष्टी इतिहासात घडल्याचे लॉक मानतो.

झां झाक रुसो (१७१२–७८या फ्रेंच तत्त्वज्ञ-विचारवंताने सामाजिक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅक्ट (१७६२या पुस्तकात केला असून हॉब्ज आणि लॉक यांच्या सामाजिक कराराविषयीच्याविशेषतः नैसर्गिक अवस्था आणि धुरीण समाज या संकल्पनांविषयी मतभिन्नता व्यक्त केली आहे. त्याच्या मते नैसर्गिक अवस्था ही प्रक्रिया शांततामय व ऐच्छिक आहे. त्याने लोकांच्या क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रतिपादिले असून जुलमी शासनसंस्थेविरुद्घ क्रांती करण्याचा जनतेला संपूर्ण अधिकार आहेहा विचार मांडला. तो फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणादायी ठरला. राज्यसंस्था हा एक करार आहेही कल्पना त्याने मांडली. नैसर्गिक जीवन तो आदर्श मानतो. माणसे स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवनावश्यक गोष्टी मिळवून एकमेकांना मदत करीत होतीतेव्हा कोणत्याही संस्थेचीसंघटनेचीराज्यसंस्थेचीदंडशक्तीची आवश्यकता वाटत नव्हतीपण जेव्हा माणसामाणसांतील संबंध गुंतागुं तीचे झाले आणि त्याला संघर्षात्मक स्वरुप प्राप्त होऊ लागलेतेव्हा नव्या समाजाच्या स्थैर्यासाठी-समाजव्यवस्थेसाठी रुसोला राज्यसंस्था अपरिहार्य वाटली.  मोठा समाज एकत्र नांदत असला की,सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एकसर्वांना समान अशी सार्वत्रिक इच्छा निर्माण होते. तीच समान इच्छा वा ईहा होय. ती स्वतंत्रसर्वांमध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक प्रेरणा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते आणि तीत त्या व्यक्तीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडक्यात रुसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःचे स्वतःलाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. राज्यसंस्था ही त्या इच्छेने उभी केलेली यंत्रणा असून ती बदलणेमोडणे इ. सर्व अधिकार त्या समान इच्छेला असल्याचे रुसो मानतो. यामुळे राजकीय विचारांच्या संदर्भात सामाजिक करार हा त्याचा सिद्घांत इंग्रजी विचारवंतांचा आर्थिक उदारमतवाद आणि फेंच तत्त्वज्ञ माँतेस्क्यू (१६८९–१७५५याची प्रत्यक्षार्थवादी अभिवृत्ती या दोहोंच्या पलीकडे जातो.हॉब्जच्या मांडणीप्रमाणे राजसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होतेतर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर काही अल्पस्वल्प बंधने येत होतीमात्र रुसोच्या सामाजिक करारात जनतेचे सार्वभौमत्व आणि समतेचा सिद्घांत ही दोन मूलगामी तत्त्वे असल्यामुळे सरंजामशाही संपुष्टात येऊन आधुनिक लोकशाहीची बीजे रोवली गेली. परिणामतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रस्थापित राजेशाही/सत्तांना रुसोच्या सामाजिक कराराने धक्का दिला. 

सार्वजनिक जीवनाचे नियमन कसे करावे, बाह्य आक्रमनांपासून आणि अंतर्गत कलहापासून  एकमेकांचे रक्षण कसे करावे यावर या करारात बरेच विवेचन केले आहे. समुदायात राहणे ही मानवाची गरज आहे, त्याला स्थैर्य, संरक्षण आणि नियमांची गरज असते आणि हे स्थैर्य, सुरक्षा आणि नियमन पुरवणे हेच राज्यसंस्थेचे काम आहे. वेबरच्या व्याख्येप्रमाणे  ज्यात मानवास आपले सार्वजनिक आणि राजकीय व्यतीत करता येईल व आपल्या क्षमतांचा विकास करता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. आणि अशा राज्यात लोकांनी नियमांचे पालन करत राहणे हे आवश्यक आहे अर्थातच राज्यसंस्थेच्या आज्नाचे पालन करणे हे राज्यसंस्था सुरळीत चालण्यासाठी आवश्यक अशी अट आहे. या  नियमांविरुद्ध जाणाऱ्याविरुद्ध कारवाई करणेही आवश्यक राज्य चालवण्यासाठी आवश्यक आहे आणि यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी तोही योग्य आहे . वेबर  defines the state as that entity, "which successfully upholds the claim, to the monopoly of the legitimate use of physical force,in the enforcement of that order,". एकाच समुदायात अनेक गट  असतात.  त्यापैकी कोणाची शक्ती सर्वमान्य मानायची आणि कोणाचे नियम लागू करायाहे हा पुढचा प्रश्न आपसूकच येतो. येथे वेबर सत्ता आणि अधिकार यामध्ये फरक करतो. सत्ता म्हणजे बळाचा वापर करून दुसर्यांना आपल्या बरहुकूम वाग्वायास लावणे. राज्य करतानाची आवश्यक अशी परंतु पुरेशी नसलेली ही बाब. परंतु अधिकार म्हणजे राज्याने बनवलेल्या नियमांचे, व्यवस्थेचे पालन संमतीने करण्याची लोकांची इच्छा मुख्यतः राज्यास आपल्या बळाचा वापर न करताच अशी संम्मती मिळणे याला वेबर खरा अधिकार म्हणतो. वेबरच्या मते अधिकार हा तीन प्रकारचा असतो. वेबरचे अधिकाराच्या बाबतीतले वर्गीकरण हे तो अधिकार त्या त्या सत्तेस कशामुळे प्राप्त होतो यावर आधारलेले आहे. आपण अभ्यास करत असलेल्या प्रदेशातील राज्यसत्ता समजून घेण्यासाठी वेबरच्या या वर्गीकरणाचा उपयोग केला आहे. 

अधिकार व सत्ता 

यातला पहिला प्रकार म्हणजे अधिकार हा वैधानिक व्यवस्थेचा भाग म्हणून आलेला, यात व्यक्तीपेक्षा त्या वैधनिक पदाला महत्व. सर्व नियम कानून आधीच सर्वसंमत असे आणि या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम या सत्ताधारकाकडे असते. ठरवलेली कामे, ठरवलेले नियम आणि अपेक्षित असा लोकांचा संमती देणारा प्रतिसाद. लोक आणि शासक यातला एक प्रकारचा करार, शासकाकडून किमान गुणवत्ता आणि कौशल्याची अपेक्षा आणि लोकांकडून निर्विवाद नियम आणि अधिकार मान्य करण्याची अपेक्षा असा हा करार. शासकाच्या अधिकार आणि सत्तेला कायदेशीर ठरवणारा 

 दुसऱ्या प्रकारचा अधिकार हा पारंपारिक रित्या हस्तांतरित झालेला. आधीच्या समाजरचनेत निर्माण झालेली सत्ता स्थाने अबाधित ठेऊन त्यांना पवित्र मानून तीच पुढे चालू ठेवण्याची पद्धत इथे दिसते. परंपरागत हस्तांतरित झालेली सत्ता आणि अधिकार हा त्या समाजरचनेत नुसताच मान्य नसतो तर त्याला पवित्रता आणि अखंडतेचे वलय  लोकांच्या मान्यतेतुन प्राप्त होत असते. गल्फ देशांमध्ये असलेल्या सध्याच्या समाजरचना किंवा परंपरागत चालू असणाऱ्या समुदायानातर्गत काही रिती रिवाज आणि ते पार पाडताना विशिष्ट व्यक्तींना मिळालेला अधिकार आणि सत्ता ही या प्रकारात मोडते. भारतात अजूनही धर्म व कर्मकांडाच्या बाबतीत ब्राह्मणांना एक विशिष्ट प्रकारची मान्यता जनमानसात दिसून येते किंवा धर्मेपीठांचे मुख्य महंत लोक विशिष्ट गटातूनच आलेले दिसतात, हे या पारंपारिक अधिकाराचे उदाहरण. हे अधिकार आणि सत्ता हे गुणवत्ता किना विशिष्ट कौशल्य यावर आधारित नसतात तर पूर्वापार असेच चालत आले म्हणून पुढेही असेच चालणार हा विचार यात मुख्य असतो. 

तिसऱ्या प्रकारचा अधिकार म्हणजे वलयांकित, करिष्म्यावर आधारित मान्यता, सत्ता आणि अधिकार. काही व्यक्तींकडे विशिष्ट अशी सुपरह्युमन गुण असतात किंवा एखाद्या प्रसंगाटेल असामान्य अशा कृतीमुळे त्या व्यक्तीभोवती असे वलय निर्माण होते आणि तीच त्या व्यक्तीच्या अधिकाराची, सत्तेची ओळख बनते. बाळासाहेब ठाकरे हे अशा करिष्म्यावर आधारित सत्तेचे आणि अधिकाराचे उदाहरण. या व्यक्ती आपल्या प्रभावामुळे लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ राज्य करतात, त्यांच्या अनेक कृतींमध्ये अपयश आलेले असले तरी त्यांचा चाहता वर्ग हा त्यांना नेहमीच वंदनीय मानतो आणि असे नेते चमत्कार करून आपल्याला सद्य परिस्थितीतून तारून नेईल अशी या समर्थकांना खात्री असते. इजिप्तमध्ये नासरचे नेतृत्व आणि तुर्कीमध्ये मुस्तफा केमालला मिळालेल्या प्रचंड समर्थनामध्ये या करिष्म्यावर आधारित नेतृत्व प्रतिमेचा मोठा भाग होता. या नेतृत्व प्रकारात एक समान धागा दिसतो आणि तो म्हणजे असे नेते आपल्या वैयक्तिक प्रतिभेच्या जोरावर सत्ता हस्तगत करतात, अधिकाराची स्थापना करतात पण त्यांना तेव्हड्याच तोडीचा वारसदार मिळेल याची काही खात्री नसते किंबुहाना बरीच अशी साम्राज्ये त्या त्या नेत्यांबरोबर कोसळताना दिसतात. 

अशा प्रकारे वेबरच्या वर्गीकरणानुसार तीन प्रकारचे अधिकार आणि सत्ता - तर्कसंगत कायद्यावर आधारित, पारंपारिक आणि वलयांकित. उत्तर आफ्रिकेतल्या देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर पारंपारिक नेतृत्वाने आपला हक्क दाखवलाच. परंतु एक मोरोक्को सोडता इतर देशात - अल्जेरिया, लिबिया, ट्युनिशिया आणि इजिप्त मध्ये हे सर्व राजे रजवाडे हे आधीच्या वासाहतिक सत्ताधाऱ्यांना सामील त्यामुळे लोकांनी त्यांचे दावे आणि वसाहतवादी राष्ट्रांचे या कठपुतली राजवटीना प्राधान्य देणे तिथल्या जनतेने उधळून लावले. मोरोक्कोत मात्र राजेशाही रुजली होती आणि लोकप्रियही होती त्यामुळे लोकांनी ती सत्ता मान्य केली. इतर देशांत नवीन राज्यकर्ते आपला अधिकार आणि सत्ता दोन्ही प्रस्थापित करत असताना लोकांचा प्रतिसाद मात्र वेगळा होता आणि त्यानुसार सुरुवातीच्या काळात अधिकार प्रस्थापित करताना त्या त्या शासकांनी वेगळे मार्ग चोखाळले.  स्वातंत्र्यानंतर इजिप्तमध्ये मोहम्मद अलीचा वारस फावूद याने सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी तो धुडकावून लावला. परकीयांना देशातून जनतेने हुसकावून लाव्वले होते आणि आता नवीन राष्ट्राच्या उभारणीत नविन व्यवस्था निर्माण करताना जुने पारंपारिक नेतृत्व कुचकामी दिसत होते, एक प्रकारची पोकळी अधिकार केंद्राच्या बाबतीत इजिप्तमध्ये जाणवत होती. नासरच्या करिष्म्याची मोहिनी लोकांवर होतीच आणि वैधानिक, कायदेशीर अशी व्यवस्था लागेपर्यन्तचा वेळ लोकांकडे आणि राष्ट्राकडे नव्हता. नासरचा राज्यकर्ता म्हणून उदय या करिष्म्याच्या बळावरच झाला आणि त्याने त्यानंतर केलेल्या अनेक भावनिक आवाहने आणि बेत याच्यावर तो टिकला. बराच काल अस्थैर्य सोसलेल्या जनमाणसास अशा पटकन स्थैर्य देणाऱ्या, घडी बसवणाऱ्या वक्तव्यांची नितांत गरज असते आणि त्याचबरोबर स्वताच्या दैदिप्यमान भविष्यकाळाचे स्वप्नही झालेल्या विध्वन्सास पुसण्यासाठी आवश्यक असते. १९४८ च्या इस्त्रायेल्च्या हल्ल्यानंन्तर इजिप्तला मानसिक दृष्ट्या अशा उभारी देणाऱ्या वक्त्यव्यांची गरज होती आणि नासरने ती भागवली हे त्याच्या चढत्या यशाचे गमक. 

नासरचे  नेतृत्व 





नासर, गद्दाफी, मुस्तफा केमाल या सगळयांच्यात विशिष्ट नेतृत्व गुण नक्कीच होते, संधीचा योग्य फायदा घेण्याचे कसब, अमोघ वक्तृत्व आणि लोकांना खिळवून ठेवणारे बेत या सगळ्याचा उपयोग त्यांनी आपली सत्ता व अधिकार स्थापन करण्यासाठी केला. लोकांमध्ये उज्वल भवितव्याची आस आणि ते भवितव्य फक्त या नेतृत्वाखालीच लोकांना मिळू शकते हा आभास त्यांनी निर्माण केला. पारंपारिक नेतृत्वाला शह देऊन लोकांचा अतुलनीय असा पाठींबा या राज्यकर्त्यांना मिळाला खरा पण त्याचबरोबर हा पाठींबा कायम टिकून राहिला पाहिजे ही निकडही त्यांना सतत जाणवत राहिली.  त्या अनुषंगाने येणारी असुरक्षितता, विरोधकांबद्दल कमालीचा तिटकारा आणि त्यांचे दमन या गोष्टीही आल्याच. नासरनेही आपल्या कारकिर्दीत आपल्या धोरणांची चिकित्सा, पुनर्र्तपासनी कधी केली नाही आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या लोकांचे असलेले परावलंबन ही वाढतच गेले. असा सर्वेसर्वा असणारा हा नेता उद्या यालाच काही झाले तर अशी भीती आणि असुरक्षितता लोकांच्या मनात अशा राजवटीत निर्माण झाली आणि खरी लोकशाही इथे रुजली नाही. जिथे जिथे असे करिष्म्यावर आधारित नेतृत्व उभे राहिले तिथे मानसिक परावलंबन आणि नेत्याचे सर्व प्रकारे समर्थन ही मानसिक प्रक्रिया दिसून येतेच पण आपल्या चुकांमधून शिकण्याची, चिकित्सा करून पुढे  वाटचाल करण्याच्या संधीही हा समाज घेत नाही.  प्रा. सादिक अल - आझम यांचे After the Defeat हे पुस्तक या मानसिकतेवर आणि राज्यकर्त्यांच्या फसव्या प्रतिमा प्रेमावर अगदी झणझणीत अंजन टाकते. या पुस्तकावर  बऱ्याच देशांत बंदी आहे पण त्याची e -copy उपलब्ध आहे. प्रा सदिकना हे पुस्तक लिहिल्याबद्दल तुरुंगवास सहन करावा लागला आणि त्यांच्या बऱ्याच देशांतील संचारास बंदी घालण्यात आली यावरून या राज्यकर्त्यांची आपल्यावरच्या टीकेबाबत असहिष्णू वृत्ती आणखीनच दिसून येते.

नासरने  १९५६  च्या विजयानंतर लोकांच्या अपेक्षा आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी अनेक घोषणा आणि कार्यक्रम सुरु केले. १९५६  चा विजय हा लष्करी विजय नव्हता फक्त राजकीय विजय आणि तोही अमेरिकेच्या मदतीने मिळवलेला. पण नासरची  आंतरराष्ट्रीय भूमिका मात्र गूटनिरपेक्ष ( non alignment) ची होती परंतु त्याचबरोबर सोवियेत रशिया कडून अमाप पैसा, साधनसामुग्री, प्रशिक्षित सल्लागार आणि शस्त्रास्त्रे ही त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली.  सोविएत संसाधनांच्या बळावर त्यांनी राष्ट्राच्या विकासाचे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु केले आणि त्याचबरोबर दक्षिणेतल्या नवमुक्त देशांची तिसरी आघाडीचे नेतृत्व आपणच करत आहोत हेही तितकेच ठासून सांगितले. खरे तर या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी पण या शक्य झाल्या फक्त शीत युद्धाच्या संदर्भात. प्रचंड प्रमाणावर दोन महासत्ता या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांत पैसा उधळत होत्या आणि त्य पैशाचे उत्तरदायित्व मात्र या राज्यकर्त्यांवर नव्हते. बऱ्याच महत्वकांक्षी प्रकल्पास बाहेरून आलेला पैसा कारणीभूत होता आणि अंतर्गत पातळीवर आणि बाह्य जगात नासरची प्रतिमा हा सर्व खेळखंडोबा चालू ठेवण्यात उपयोगी पडत होती.गटनिरपेक्ष चळवळीबरोबरच नासरने संयुक्त अरब आघाडीची स्थापना करून त्याचे नेतृत्वही आपल्याकडे घेतले होते. इजिप्त आणि नासर यांनी प्यान अरेबिस्म चा पाया घातला आणि सर्व अरब देशांच्या नेतृत्वावरही आपला हक्क सांगितला. परंतु हे खरे नेतृत्व न ठरता पोकळ वल्गना ठरल्या कारण हे हक्क जतवण्यामागे इजिप्तची खरी ताकद - राजकीय, लष्करी किंवा सांस्कृतिक अशी विकसित झाली नव्हती, त्यामुळे हे दावे दावेच राहिले, त्यांना प्रत्यक्ष स्वरूप आले नाही आणि परिणामी नासरच्या प्रतिमेबरोबरच या सर्व नेतृत्वाच्या कल्पनाचा ऱ्हास झाला. नासरच्या पलीकडे जावून इजिप्तमध्ये प्रशासन, आर्थिक विकास  किंवा लष्कर कशाचीच घडी बसली नाही. सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण झाले, अस्वानही बांधले गेले परंतु देशात प्रशासकीय सुधारणा न झाल्यामुळे या विकासाची फळे लोकांपर्यंत पोहोचली नाहीत आणि सोविएतची मदत संपल्यावर स्व बळावर पुढे फारशी काही कामेही झाली नाहीत. 

नासरने इस्रायेलला शह देण्यासाठी संयुक्त अरब आघाडीची स्थापना केली. १९४८ मध्ये इस्रायेल समोर झालेला अरब राष्ट्रांचा बीमोड ही सल होतीच आणि वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेल्या सीमा ओलांडून एक अरब राष्ट्राची निर्मिती हे या अरब आघाडीचे स्वप्न होते. त्यानुसार इजिप्त आणि सिरीयाने मिळून आपले संयुक्त सरकारही बनवले होते. नासर १९५६ च्या विजयानंतर या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतो.  संपूर्ण अरब जगताचे नेतृत्वावर दावा सांगताना इतर अरब नेते आणि मुख्यतः आखातातले पाश्चीमात्यांच्या आधारावर असणाऱ्या नेत्यांवर आक्रमक टीका नासर करतो. येमेनी यादवी युद्धात नासरची  याबाबतीतली भूमिका अगदी स्पष्ट दिसून येते. नासर आणि इजिप्त या येमेंच्या अंतर्गत  संघर्षात डाव्या विचारसरणीच्या  प्रजासत्ताकवादी गटास फक्त तात्त्विक पाठिंबाच नाही तर आर्थिक आणि लष्करी सहाय्यही करतात. अर्थातच सोविएतची प्रचंड मदत नासरला यावेळी होतेच. येमेन असो की प्यालेस्तायीनचा प्रश्न सोवियेतच्या पाठीम्ब्याशिवाय इजिप्त ही कृती करू शकला नसता. ही सर्व फुकटात आलेली साधन सामुग्री होती, नासरच्या महत्वकान्क्षेला खतपाणी घालणारी पण त्याचबरोबर या सामुग्रीच्या देण्याच्या बदल्यात या देशांच्या स्वयंविकासाच्या प्रेरणा मारनारी अशी ही प्रक्रिया होती. इस्रायेलच्या तोडीची  अद्ययावत सामग्री असतानाही संयुक्त आघाडी १९६७ चे युध्द हरली आणि नासरने सत्तेचा राजीनामा स्वतहून दिला. प्रा सादिक्ने याच युद्धानंतर या फुकटच्या सहयोगावर आधारित बेडकी महत्वकांक्षा कशा आत्मघातकी ठरत आहेत हे त्यांच्या पुस्तकात दाखवून दिले होते. परंतु नामुष्की पत्करून नासरने राजीनामा दिला असतानाही त्याला लोकांनी पुन्हा सत्तेवर बसवलेच. १९७० मध्ये त्याचे निधन झाले त्यामुळे ही दुसरी खेळी अत्यल्प काळाची राहिली. पण  १९६७ साली या प्रसंगी नासरला परत आणताना लोकांनी केलेली निदर्शने नासरबद्दल असलेल्या निष्ठेचे जसे प्रतिक होते तसेच त्याच्या असामान्य शक्तीवर लोकांचे मानसिक अवलंबन झाल्याचेही द्योतक होते. 




शासक आणि शास्ते यांच्यात एक मानसिक सह्जीवित्व symbiosis  घडताना इथे दिसते. इजिप्त नासर शिवाय देशाची कल्पना करू शकत नाही आणि लोकांचा हा पाठिंबाच नासारच्या महत्वाकांक्षेला घडवतो, नवोन्मेषी रूप देताना दिसतो. स्वतःबद्दल्च्या, देशाबद्दलच्या मोठ्या, महत्वाकांक्षी प्रतिमा न तर हे लोक विसरू शकत आणि अगदी दारुण पराभव झाला तरी या नेत्यांना आत्म्चीकीत्सा करावीशी नाही वाटत असा हा तिढा करिष्म्यावर आधारित नासरच्या नेतृत्वात दिसून येतो. अंतर्गत पातळीवर नासरला शेवटपर्यंत प्रचंड पाठींबा मिळाला परंतु संयुक्त अरण राष्ट्राच्या त्याच्या कल्पना व त्याचे स्वयंघोषित नेतृत्व मात्र बऱ्याच अरब राष्ट्रांना खुपत होते.  साठच्या दशकात तेलाच्या पैशाने गबर होणाऱ्या सौदीने आता अरब राष्ट्रांचे नेतृत्व व इजिप्तचा नेतृत्वाचा दाव्यास आवाहन द्यायला सुरुवात केली. सौदीमध्ये  मुस्लिम धर्माची दोन्ही महत्वाची पवित्रस्थळे आणि त्यांचे नियंत्रण सौदीच्या शेखाकडे. या घराण्यावर अब्दुल वहाब या कडव्या, विशुद्धवादी puritanical विचारसरणीचा प्रभाव. इजिप्तच्या वाढत्या डाव्या विचारसरणीस आणि हस्तक्षेपास शह देण्यासाठी वहाबी इस्लामची आयात सौदी आपला प्रभाव वाढवण्यासाठी याच वेळी करू लागला. सौदीकडे प्रचंड पैसा होता, अमेरिकेचे तेलाच्या निर्यातीमुळे संरक्षण होतेच आणि त्यातच इजिप्तला असणारे सोविएतचे  पाठबळास प्रतुत्तर देण्यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रे सज्ज होतीच. सौदीने आपला प्रभाव वाढवण्यासाठी अरब आणि ,मुस्लिम जगतात धर्म आणि त्यावर आधारित संस्था यांना वाढावा देण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथे बांधलेल्या भव्य मशिदी, मदरसे ही यासंदर्भातील काही उदाहरणे. सौदीचा उद्देश फक्त इमारती आणि संस्थाबांधणी एव्हडाच नव्हता तर वहाबी इस्लामचा प्रसार आणि त्यावर आधारित आपला अधिकार आणि सत्ता संपूर्ण मुस्लिम जगतावर स्थापन करणे हे त्यामागे अभिप्रेत होते. गेल्या अर्धशतकात इस्लामच्या या एका अतिशय संकुचित, सनातनी, xenophobic मतप्रवाहाने मुस्लिम जगताचा कब्जा तर घेतला आहेच पण त्याचबरोबर इस्लामची आणि मुस्लिमांची एक विशिष्ट असहिष्णू अशी प्रतिमाही निर्माण केली आहे. इस्लामचा प्रसार प्रचार हा प्रेषिताच्या कालापासून विविध मार्गे होतच राहिला आहे. जिथे जिथे हा धर्म गेला तिथे  त्याचे अने अंगांनी स्थानिकीकरण झाले. मूळ श्रद्धा एकाच असली तरी कर्मकांडात फरक पडला परंतु इस्लामच्या आणि जगाच्या इतिहासात धर्माची एकेरी मांडणी आणि त्यावर आधारित समाजसंघटन  इतक्या व्यापक पातळीवर पहिल्यांदा होताना दिसत आहे. सौदी अरेबिया वरच्या लेखांमध्ये याचा विस्तृत अभ्यास मांडला आहे पण महत्वाची गोष्ट या लेखाच्या संदर्भातली नासरच्या समग्र अरब देशाच्या नेतृत्वास आव्हान देताना सुरु झालेली ही प्रक्रिया पुढच्या दशकात इतके थैमान घालेल असे कदाचित साठीच्या दशकात खुद्द सौदिलाही कळले नसेल. उत्तर आफ्रिकेच्या संदर्भात आधुनिकता आणि इस्लामिकवाद या दोन्ही गोष्टीतला संघर्ष प्रबळ का आणि कसा होत गेला यावर थोडे विचार करूयात. 

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...